म्युच्युअल फंडांच्या जगात
अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना (Concepts) आणि प्रकार पुढे आले आहेत, जे
गुंतवणूकदारांना अधिक पर्याय आणि पारदर्शकता देतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे
लाईफ सायकल फंड्स. हे कसे काम करतात याची वैशिष्टये आणि फायदे याविषयी सविस्तर
जाणून घेऊ या.
लाईफ सायकल
फंड्स (Life
Cycle Funds), ज्यांना 'टार्गेट डेट
फंड्स'
(Target Date Funds) असेही म्हटले जाते, हा म्युच्युअल फंडचा एक अत्यंत स्मार्ट आणि
आधुनिक प्रकार आहे. नुकतेच भारतीय बाजार नियामक 'सेबी' (SEBI) ने या फंड्सना भारतात एका नवीन कॅटेगरीच्या
रूपात मंजुरी दिली आहे. या फंडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे फंड तुमचे वय आणि तुमचे आर्थिक उद्दिष्ट लक्षात घेऊन, जसा जसा वेळ
पुढे जाईल तसा तसा आपला जोखीम (Risk) स्वतःहून कमी करत जातात. यामध्ये गुंतवणूकदाराला
वारंवार आपला पोर्टफोलिओ बदलावा लागत नाही.
हे फंड कसे काम
करतात?
हे फंड 'ग्लाईड पाथ' या मॉडेलवर काम
करतात. ज्याप्रमाणे एखादे विमान लँडिंग करताना हळूहळू आपली उंची कमी करते, अगदी
त्याचप्रमाणे हा फंड मॅच्युरिटी (परिपक्वता) जवळ येईल तशी आपली जोखीम कमी करत जातो.
सुरुवातीची
वर्षे: जेव्हा तुमच्या
उद्दिष्टाला (उदा. रिटायरमेंट किंवा मुलांचे उच्च शिक्षण) १५ ते २० वर्षांचा मोठा
कालावधी बाकी असतो, तेव्हा फंडचा मोठा हिस्सा (७०% ते ९०%) इक्विटी (शेअर मार्केट) मध्ये गुंतवला
जातो, जेणेकरून दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल.
मध्यम काळ: जसा जसा वेळ पुढे सरकतो आणि उद्दिष्ट जवळ येते
(उदा. १० वर्षे बाकी असताना), तसा फंड मॅनेजर शेअर मार्केटमधील गुंतवणूक कमी
करून ती ४०% ते ६०% वर आणतो आणि सुरक्षित पर्यायांमध्ये पैसे वर्ग करू लागतो.
अंतिम वर्षे: जेव्हा उद्दिष्टाला फक्त १ ते २ वर्षे बाकी
असतात, तेव्हा जमा झालेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतांश पैसे डेट फंड आणि सोने-चांदी सारख्या अत्यंत सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवले जातात (या
काळात इक्विटी फक्त १०% ते २५% राहते).
लाईफ सायकल
फंड्सची मुख्य वैशिष्ट्ये
फंडाच्या
नावावरूनच कालावधी समजतो: या फंड्सच्या नावावरूनच ते कधी मॅच्युर होणार आहेत हे कळते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या फंडाचे नाव "Life Cycle Fund 2045" असेल, तर याचा अर्थ
असा की, ज्यांचे आर्थिक उद्दिष्ट वर्ष २०४५ च्या आसपास आहे, त्यांच्यासाठी
हा फंड आहे.
निश्चित कालावधी: सेबीच्या नियमांनुसार, हे फंड ५ च्या
पटीत म्हणजेच ५, १०, १५, २०, २५ किंवा ३० वर्षांच्या कालावधीसाठी लॉन्च केले जातात.
मल्टी-असेट
डायव्हर्सिफिकेशन: हे फंड फक्त शेअर्स किंवा बॉन्ड्समध्येच नाही, तर सोने आणि चांदी मध्येही गुंतवणूक करतात. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा
गुंतवणुकीवर जास्त परिणाम होत नाही.
कडक एक्झिट लोड: गुंतवणूकदारांनी शिस्त पाळावी आणि वेळेपूर्वी
पैसे काढू नयेत यासाठी सेबीने यामध्ये कडक एक्झिट लोड ठेवला आहे (उदा. १ वर्षाच्या
आत पैसे काढल्यास ३%, २ वर्षात २%, आणि ३ वर्षात १% शुल्क लागू शकते).
लाईफ सायकल
फंडचे फायदे
ऑटोमॅटिक
रिबॅलन्सिंग: तुम्हाला स्वतः
मार्केटचा अभ्यास करून कधी शेअर्स विकायचे आणि कधी सुरक्षित फंडात पैसे टाकायचे
याचा विचार करावा लागत नाही. फंड मॅनेजर हे काम सॉफ्टवेअर आणि नियमांच्या आधारे
ऑटोमॅटिकली करतो.
टॅक्सची बचत: जर तुम्ही स्वतः इक्विटी फंडातून पैसे काढून डेट
फंडात टाकले, तर तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो.
परंतु, लाईफ सायकल फंडच्या आत जेव्हा असेट मिक्स बदलते, तेव्हा गुंतवणूकदाराला कोणताही टॅक्स द्यावा
लागत नाही.
गुंतवणूक करा
आणि विसरून जा: हा पर्याय अशा
लोकांसाठी उत्तम आहे जे रोज मार्केट ट्रॅक करू शकत नाहीत. एकदा गुंतवणूक सुरू केली
की हा फंड पूर्णपणे ऑटो-पायलट मोडवर चालतो.
कोणी गुंतवणूक
करावी?
जे आपल्या रिटायरमेंटचे नियोजन करण्यासाठी एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध मार्ग शोधत आहेत.
ज्यांना मुलांचे शिक्षण
किंवा लग्न (जे १०-१५ वर्षांनंतर होणार आहे) यासाठी खात्रीशीर पैसे जमा करायचे
आहेत.
असे गुंतवणूकदार ज्यांना
म्युच्युअल फंडची जास्त समज नाही, पण एकाच फंडात इक्विटी, डेट आणि गोल्ड
या तिन्हींचा फायदा घ्यायचा आहे.
डॉ. रिता सविता मदनलाल शेटीया
लेखिका : अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका
आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा